जळगाव : प्रतिनिधी
‘माझे दागिने माझ्यासोबतच जाऊ द्यावे….’ अशी आईची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुलांनी तिच्या अंगावरील दागिन्यांसह अंत्यसंस्कार केले, मात्र चोरट्यांनी वृद्धेची ही शेवटची इच्छाही पूर्ण होऊ दिली नाही. अंत्यसंस्कारानंतर दागिन्यांसाठी वृद्धेच्या अस्थीच चोरून नेल्याचा संतापजनक प्रकार मंगळवारी (७ ऑक्टोबर) समोर आला. आईच्या अस्थीही शेवटी हाती लागू न शकल्याने मयत वृद्धेचे कुटुंब हताश झाले आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसलेल्या मेहरुण स्मशानभूमीतील या प्रकाराबद्दल सदर कुटुंबासह आमदार व अन्य जणांनी महापालिकेच्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

एसटी कामगार संघटनेचे पदाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या आई छबाबाई काशीनाथ पाटील (रा. गायत्रीनगर) यांचे रविवारी निधन झाले. ६ ऑक्टोबर रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ७ रोजी तिसऱ्या दिवशी पाटील कुटुंबीय अस्थी संकलनासाठी स्मशानभूमीत गेले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. अंत्यसंस्कार केलेल्या ओट्यावरील सर्व अस्थी गायब होत्या व तेथे केवळ राख शिल्लक असल्याचे आढळले.
मंगळवारी सकाळी अस्थी संकलनावेळी पाटील कुटुंबीय स्मशानभूमीत गेले असता तेथे केवळ राख शिल्लक होती. गळा, कान, नाक व डोक्याला टिकली एवढ्या भागावर सोन्याचे दागिने असल्याने चोरट्यांनी कवटीसह सर्वच अस्थी चोरून नेल्या. विसर्जनासाठीही अस्थी शिल्लक 5 नसल्याने कुटुंबीयांनी आईच्या देहाची केवळ राख घेऊन ती विसर्जित केली. यासंदर्भात एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली व अस्थींचा शोध घेण्याची मागणी केली आहे. या प्रकारानंतर पाटील कुटुंबीयांसह त्यांच्या नातेवाईकांनी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे तक्रार केली. त्यावेळी आमदार भोळे हेदेखील स्मशानभूमीत पोहोचले.
ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्याचे सांगत महापालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. या स्मशानभूमीमध्ये कुंपण भिंत, सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक नाही. त्यामुळे येथे या उपाययोजना करण्यात याव्या, अशी मागणी करण्यात आली. तसेच आमच्या आईच्या अस्थी गेल्या, यापुढे असा प्रकार आणखी कोणासोबत घडू नये, यासाठी २४ तासांच्या आत सुरक्षा रक्षक नेमावा, अशी भावना राजेंद्र पाटील यांनी व्यक्त केली.
छबाबाई पाटील यांनी स्वतःच्या स्त्री धनासह अंत्यसंस्कार करून दागिने माझ्या सोबतच जाऊ द्यावे, अशी शेवटची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार मुलांनीही आईची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी तिच्या मृत्यूनंतर गळ्यातील एक तोळे सोन्याचे मणी, नाकातील नथ, कानातील बाळ्या व किल्लू अंगावर राहू दिले. यासोबतच वृद्धेच्या भावाने सोन्याची टिकलीही शेवटी दिली. या सर्व दागिन्यांसह वृद्धेवर अंत्यसंस्कार करण्यात आले



