Home » महाराष्ट्र » आईच्या विश्‍वासाला तडा; प्रेमात अडकलेल्या मुलीने घर लुटले !

आईच्या विश्‍वासाला तडा; प्रेमात अडकलेल्या मुलीने घर लुटले !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

प्रेमाच्या आंधळ्या मोहात अडकलेल्या १९ वर्षीय तरुणीने आपल्या प्रियकराच्या सांगण्यावरून आईचे सुमारे ११ तोळे सोनं आणि १ लाख ५५ हजार रुपये त्याला काढून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना शनिवारी (दि. ९) भारतनगर, एन १३, हडको भागात घडली. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी मंगेश विलास पंडित (वय १९, रा. बेगमपुरा) आणि त्याचा मित्र कुणाल माणिक केरकर (वय १९, रा. बेगमपुरा) यांना अटक केली असून न्यायालयाने दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

फिर्यादी महिला या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त असून त्यांना दोन मुले आहेत. रक्षाबंधनाच्या दिवशी (दि. ९) सकाळी मुलाने सोन्याची अंगठी मागितल्यानंतर त्यांनी कपाट तपासले असता सर्व दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे लक्षात आले. चौकशीत मुलीने कबूल केले की, तिनेच दागिने आणि रोकड रुमालात गुंडाळून प्रियकर मंगेश पंडितकडे सुपूर्त केली होती.

तिने पोलिसांना सांगितले की, मंगेशने पैशाची गरज असल्याचे सांगून वारंवार तगादा लावला होता. प्रेमात अंध झालेल्या मुलीने एक रात्री दोरीच्या साहाय्याने बकेटमध्ये दागिने सोडून त्याच्याकडे पोहोचवले. या गुन्ह्यात मंगेशच्या मदतीला त्याचा मित्र कुणालही सहभागी होता. पोलिसांच्या तपासात अद्याप दागिने कुठे गेले याचा खुलासा झाला नाही असून, अधिक तपास उपनिरीक्षक सचिन देशमुख करत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *