Home » महाराष्ट्र » नाशिक भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; पक्षप्रवेशांमुळे अंतर्गत वाद उफाळले

नाशिक भाजपमध्ये ‘इनकमिंग’चा धडाका; पक्षप्रवेशांमुळे अंतर्गत वाद उफाळले

नाशिक : वृत्तसंस्था 

राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकांचे वारे वाहू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपने मोठा ‘इनकमिंग’ कार्यक्रम आयोजित करत विरोधी पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांना पक्षात सामील करून घेतले. मात्र, या पक्षप्रवेशांनी भाजपची ताकद वाढली असली तरी त्याचवेळी नाशिक भाजपमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात उबाठा शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर व उबाठा नेते यतीन वाघ, काँग्रेस नेते शाहू खैरे, मनसेचे माजी आमदार नितिन भोसले आणि मनसेचे स्थानिक नेते दिनकर पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या एकाच कार्यक्रमात विविध पक्षांतील नेत्यांचा प्रवेश झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

मात्र, या ‘इनकमिंग’वरून भाजपच्या नाशिक महापालिका निवडणूक प्रमुख आणि आमदार देवयानी फरांदे यांची नाराजी उघडपणे समोर आली. पक्षप्रवेश कार्यक्रमाला त्या अनुपस्थित राहिल्या. विशेषतः माजी महापौर यतीन वाघ यांच्या प्रवेशाला फरांदे यांचा तीव्र विरोध होता. या प्रवेशाबाबत आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत, स्थानिक कार्यकर्त्यांच्या संधी धोक्यात येतील, अशी भूमिका घेतली होती.

पक्षप्रवेशापूर्वी भाजप कार्यालयाबाहेर हाय-व्होल्टेज ड्रामाही पाहायला मिळाला. यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या प्रवेशाविरोधात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरही हा विरोध व्यक्त करण्यात आला. मात्र, सर्व आक्षेप आणि नाराजी डावलून अखेर पाचही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला.

या घडामोडींमुळे नाशिक भाजपमध्ये स्थानिक नेतृत्व विरुद्ध बाहेरून येणारे नेते असा संघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतर्गत वाद पक्षासाठी डोकेदुखी ठरणार की ‘इनकमिंग’चा फायदा होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *