Home » जळगाव » लाल किल्ला स्फोटानंतर देशभर अलर्ट; महानगरी एक्सप्रेसला बॉम्बची धमकी, भुसावळ स्टेशनवर खळबळ!

लाल किल्ला स्फोटानंतर देशभर अलर्ट; महानगरी एक्सप्रेसला बॉम्बची धमकी, भुसावळ स्टेशनवर खळबळ!

भुसावळ : प्रतिनिधी

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर देशभरात सुरक्षेचा तणाव वाढलेला असतानाच, मुंबईहून बनारसकडे जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा संदेश मिळाल्याने भुसावळ रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली. पोलिसांनी तात्काळ तपासणी करून रेल्वे सुरक्षित असल्याची खात्री करून ती पुढे रवाना केली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, महानगरी एक्सप्रेसच्या एका कोचमधील स्वच्छालयात “पाकिस्तान जिंदाबाद”, “आयएसआय” असे शब्द आणि गाडीत बॉम्ब असल्याचा संदेश लिहिलेला आढळला. हा संदेश पाहताच प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी घाबरून गेले. माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व पोलिसांनी तत्काळ तपासणी मोहीम सुरू केली. दरम्यान, लाल किल्ला परिसरातील स्फोटानंतर महाराष्ट्रासह देशभरात उच्च सतर्कता जाहीर करण्यात आली होती. त्यातच या धमकीच्या घटनेमुळे पोलिस प्रशासन अधिकच सावध झाले. जळगाव आणि भुसावळ या दोन्ही स्थानकांवर रेल्वेची कसून तपासणी करण्यात आली. मात्र, तपासानंतर कोणताही संशयास्पद वस्तू न आढळल्याने ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा वाढवण्यात आली असून, पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाने प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *