मुंबई : वृत्तसंस्था
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांमुळे राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. दमानिया यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित घटनांबाबत शंका उपस्थित करत, तसेच पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहारांबाबत भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आक्रमक झाली आहे. पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दमानिया यांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध करत थेट कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अंजली दमानिया यांची आजची पत्रकार परिषद ऐकून समाजात किती खालच्या पातळीची विकृत मानसिकता असू शकते, याचा प्रत्यय येतो. त्यांना कपोलकल्पित कथा सांगण्याची सवय आहे. त्या सातत्याने एका व्यक्तीला आणि एका कुटुंबाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत.”
चाकणकर पुढे म्हणाल्या की, “यापूर्वीही अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर अनेक आरोप केले; मात्र त्यापैकी एकही आरोप त्या सिद्ध करू शकल्या नाहीत. आता त्या पार्थ पवार यांच्यावर आरोप करत आहेत. हे अत्यंत घाणेरडे राजकारण आहे.” कुटुंबीय दुःखातून जात असताना अशा प्रकारची वक्तव्ये करणे असंवेदनशील असल्याचे सांगत, दमानिया यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, आमदार अमोल मिटकरी यांनीही सोशल मीडियावरून अंजली दमानिया यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “दुःखाच्या काळात केलेली अशी विधाने अत्यंत दुर्दैवी आणि असंवेदनशील आहेत. तथ्यांशिवाय संशय निर्माण करणे ना माणुसकीला शोभते, ना जबाबदार सार्वजनिक भूमिकेला. या असंवेदनशीलतेचा निषेध व धिक्कार.” या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापले असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


