Home » महाराष्ट्र » जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे नवे उच्चांक!

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीचे नवे उच्चांक!

मुंबई : वृत्तसंस्था

उत्तर महाराष्ट्राचे मानबिंदू आणि ‘सुवर्णनगरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरांनी नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अवघ्या चार दिवसांत सोन्याच्या दरात प्रति तोळा ३,२०० रुपयांची वाढ झाली असून, चांदीच्या दरात तब्बल १७ हजार रुपयांची उसळी नोंदविण्यात आली आहे. परिणामी चांदीचा दर प्रति किलो २ लाख २२ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

२२ डिसेंबर रोजी जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर १,३३,५०० रुपये होता. तो आज २५ डिसेंबर रोजी वाढून १,३६,७०० रुपयांवर स्थिरावला आहे. सोन्याच्या दरातील या झपाट्याने झालेल्या वाढीमुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, बाजारात चर्चेला उधाण आले आहे.

चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. २२ डिसेंबर रोजी प्रति किलो २,०५,००० रुपये असलेली चांदी चार दिवसांत थेट २,२२,००० रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या दरातील ही वाढ गेल्या अनेक महिन्यांतील उच्चांकी मानली जात आहे.

सोन्या-चांदीच्या वाढत्या दरांमुळे दागिन्यांची खरेदी काहीशी मंदावली असली, तरी गुंतवणूकदारांचा ओढा मात्र कायम असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले. येत्या काळात जागतिक बाजारातील घडामोडी आणि डॉलरच्या हालचालींवर दरांची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *