मुंबई : वृत्तसंस्था
विधानसभा निवडणुकीपूर्वीच लाडकी बहिण योजना महायुती सरकारने सुरु केली होती आता लाडकी बहीण योजनेतील अर्जांची सध्या काटेकोर फेरतपासणी सुरू असून, पात्र लाभार्थ्यांना वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
योजनेत काही महिलांच्या नावावर बँक खाते नसल्याने रक्कम त्यांच्या पतींच्या खात्यात जमा होत असली, तरीही त्या अपात्र ठरणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ही योजना गरजू महिलांसाठी असून, चुकीच्या पद्धतीने कोणी लाभ घेऊ नये यासाठी स्क्रूटिनी केली जात आहे, असे त्या म्हणाल्या.
गेल्या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर एकूण 2 कोटी 63 लाख अर्ज आले होते. त्यापैकी 10 ते 15 लाख अर्ज अपात्र ठरले होते. सध्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या 26 लाख अर्जांच्या डेटावर अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अधिकारी मेहनत घेत आहेत. शासकीय सेवेत असूनही लाभ घेत असल्याचे आढळल्यास शासन योग्य निर्णय घेईल. लाभार्थ्यांनी अंगणवाडी सेविकांना आवश्यक माहिती व कागदपत्रे देऊन सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री तटकरे यांनी केले. रायगड जिल्ह्यात सध्या सुमारे पावणे सहा लाख लाभार्थी महिला आहेत, तर 60 लाभार्थी महिलांवर फेरतपासणी होणार आहे.
