अहिल्यानगर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाला आहे. काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला आहे. ही घटना घडली तेव्हा हाके गाडीतच होते. पण सुदैवाने त्यांना कोणतीही घटना घडली नाही. पण मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे गत काही दिवसांत हाके व त्यांच्या सहकाऱ्यांवरील हल्ले वाढल्यामुळे चिंता वाढली आहे.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, लक्ष्मण हाके यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्य नांदूर येथे ओबीसी एल्गार सभा होणार होती. या सभेसाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह कारने जात होते. रस्त्यात ते एकेठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबले. तेथून पुढे निघाल्यानंतर त्यांचा ताफा नगर तालुक्यातील अरणगाव लगत पोहोचला असता अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी रोखून गाडीवर दगड व लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. त्यात त्यांच्या कारचे मोठे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. हा हल्ला झाला तेव्हा लक्ष्मण हाके कारमध्येच होते. पण सुदैवाने त्यांना काहीही झाले नाही.
दुसरीकडे, लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहिल्यानगरचे पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात होते. नगर तालुक्याच्या हद्दीत एकेठिकाणी रेस्टॉरंटमध्ये त्यांनी नाश्ता केला. त्यानंतर तेथून पुढे जात असताना काही इसमांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना तेथून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर हल्लेखोरांपैकी तिघांना त्यांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असे ते म्हणाले.
आम्ही जगायचे की नाही हे सांगा – हाके
लक्ष्मण हाके यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, आम्ही दौंडमार्गे नगर बायपासने आम्ही पाथर्डीकडे वळणार होतो. तिथे सारंगी नामक हॉटेल आहेत. आमच्यासोबत पोलिसांच्या दोन गाड्या होत्या. त्यात जवळपास 10-12 पोलिस होते. तरीही वर्दीला न घाबरता त्या लोकांनी 2-3 फुटांचे बांबू घेऊन गाडीवर हल्ला केला. आम्ही जीव जाईपर्यंत लढणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा. आमची अजिबात काळजी करू नये.
हा माझा पर्सनल विषय नाही. मी कुठला गुन्हेगार नाही. मी कधीच कायदा हातात घेतला नाही. आम्ही फक्त ओबीसींची बाजू मांडतोय. आमच्यावर हल्ले होत आहेत. तुम्ही ओबीसींची बाजू ऐकण्यास तयार नाही. आमच्यावर होणाऱ्या हल्ल्यांवर तुम्ही बोलण्यास तयार नाही. या महाराष्ट्रात ओबीसींनी राहायचे की नाही याचे उत्तर मुख्यमंत्र्यांना द्यावे लागेल. आम्ही उपोषण केल्यापासूनचा हा नववा हल्ला आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांनी आम्ही जगायचे की नाही एवढेच आम्हाला सांगावे, असे लक्ष्मण हाके यावेळी बोलताना म्हणाले.



