मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणूक सुरु होण्यापूर्वीच सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी परवाच्या मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. “शिवसेनेमुळे भाजप वाढला” या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार पलटवार करत, शिवसेनेमुळे भाजप वाढला, हा उद्धव ठाकरे यांचा भ्रमसून सध्याच्या उबाठा नेतृत्वात बाळासाहेबांचा मोठेपणा आणि वास्तवदर्शीपणाच्या वैशिष्ट्यांचा अभाव असल्याची टीका केली. तसेच युतीच्या स्थापनेपासूनचे आकडे आणि जुन्या आठवणी तपासून पाहण्याचा सल्ला दिला.

भाजप प्रवक्ते यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत उद्धव ठाकरेंच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, वास्तवाचे भान व मोठे मन हे बाळासाहेबांचे वैशिष्ट्य होते. त्याचाच नेमका अभाव विद्यमान उबाठा नेतृत्वात आहे. उद्धव ठाकरे सध्या वेगळ्या भ्रमात वावरत आहेत. तसे नसते, तर बाळासाहेबांनी राजकारणात हिंदुत्व आणून चूक केली, असे ते म्हणाले नसते.
शिवसेनेमुळे भाजपा वाढली हा त्यांचा असाच एक भ्रम! परवाच्या मेळाव्यात त्यांनी पुन्हा ही रेकॉर्ड वाजवली. हे तर त्यांच्या संभ्रमित मनाचे मिथक आहे. कोणतीही युती, आघाडी ही मुळातच दोन किंवा अधिक पक्षांची गरज असते. दोन पक्षांच्या मतांच्या बेरजेतून विजयाची मोठी संधी साधता येते तेव्हाच कोणतीही युती, आघाडी होत असते.
महाराष्ट्रात शिवसेनेच्या स्थापनेआधी जनसंघ होता, आणि शिवसेनेसोबत युती होण्यापूर्वी भाजप होता. जनसंघ-भाजपाचे नगराध्यक्ष, महापौर सुध्दा झाले होते. युती होण्याआधी आमदार सुध्दा भाजपाचे अधिक होते. भावनेच्या आहारी जाऊन भाजपाच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आकडे तपासून पहा. मा. बाळासाहेब ठाकरे व मा. प्रमोद महाजन हे दोघेही दिलदार नेते होते. हिंदुत्चाच्या मुद्यावर भाजपा शिवसेना एकत्र आले. तेव्हाही युतीमध्ये कुरबुरी होत्या, पण प्रमोदजी व बाळासाहेबांच्या भेटीनंतर पुन्हा दिलजमाई व्हायची. त्यानंतर गोपीनाथजींनी ही मैत्री जपली.
मला आठवते, शिवसेनेकडे असलेल्या चिमूर विधानसभेच्या जागेवरून त्यावेळचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा नितीन गडकरी प्रचंड आग्रही होते. शिवसेनेकडूनही नेते ही जागा सोडणार नसल्याचे ठामपणे सांगत होते. गोपीनाथजी बाळासाहेबांना भेटले, गोपीनाथजींनी जमिनीवरची परिस्थिती सांगितली व भाजपा लढला तर युतीचे आमदार वाढतील हे सांगितले, आणि तत्काल बाळासाहेबांनी ही जागा भाजपासाठी सोडली, असे केशव उपाध्ये म्हणाले.



