Home » राष्ट्रीय » राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात !

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल पाहायला मिळत असून अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस तसेच गारपीट झाली, यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अवेळी आलेल्या या पावसामुळे कांद्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. जवळपास हजार रुपयांपर्यंत कांद्याच्या दरात घसरण झाल्याचे समजते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

कांद्याच्या दरात घसरण झाल्याने आता नाफेडकडून कांदा खरेदी केली जाऊ शकते. याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. नाशिक येथील लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरले आहेत. त्यात भारत पाकिस्तान युद्धामुळे भारताने पाकिस्तानात निर्यात बंदी केली आहे. तसेच बांगलादेशात राजकीय परिस्थिती बिकट असल्याने तिकडेही कांदा निर्यातीत घट झाली आहे.

नाफेड आणि एनसीसीएफकडून अद्याप कांद्याची खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता या खरेदीच्या सुरुवातीकडे लागले आहे. सध्या बाजारात कांद्याची आवक वाढलेली असून मागणी मात्र कमी असल्याने कांद्याच्या दरावर थेट परिणाम झाला आहे. देशांतर्गत पुरवठा वाढल्याने कांद्याचे भाव घसरले आहेत. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला 1151 रुपये दर मिळाला, तर नाशिक बाजार समितीत हा दर 900 रुपये होता. येवला बाजार समितीत केवळ 851 रुपये दर नोंदवण्यात आला. मनमाड आणि पिंपळगाव बसवंत बाजारात कांद्याचा दर 1100 रुपये इतका होता.

देशात सर्वाधिक कांद्याचे उत्पादन नाशिक जिल्ह्यात होते, आणि लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र, गेल्या महिन्याभरात नाशिक जिल्ह्यात अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली, ज्याचा मोठा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा, कांद्याचे बियाणे तसेच आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले असून, परिणामी बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *