Home » महाराष्ट्र » 25 वर्षांनंतर काँग्रेस–वंचितची हातमिळवणी; महापालिकेत संयुक्त लढत

25 वर्षांनंतर काँग्रेस–वंचितची हातमिळवणी; महापालिकेत संयुक्त लढत

मुंबई : वृत्तसंस्था 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम अधिकच अटीतटीचा होत असतानाच राज्याच्या राजकारणात एक अत्यंत निर्णायक घडामोड समोर आली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी यांनी अखेर अधिकृतपणे युतीची घोषणा केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत या युतीची माहिती दिली.

या नव्या समीकरणामुळे मुंबईच्या राजकीय पटलावर मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली असून, ही आघाडी सत्तेसाठी नसून भाजपला रोखण्यासाठी आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी स्पष्ट केले.  यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस आणि वंचित हे ‘नैसर्गिक मित्र’ असल्याचे नमूद केले. “समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लोकशाही मूल्ये जपली पाहिजेत, ही आमची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. याआधी नगरपरिषद निवडणुकांमध्ये काही ठिकाणी आम्ही एकत्र लढलो असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले. आज त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आम्ही अधिकृतपणे एकत्र आलो आहोत,” असे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, काँग्रेसच्या स्थापना दिनीच ही युती जाहीर होत असून, त्यामुळे एका नव्या वैचारिक अध्यायाची सुरुवात होत असल्याचेही सपकाळ यांनी स्पष्ट केले. “1999 नंतर आम्ही राजकीयदृष्ट्या वेगळे होतो. तब्बल 25 वर्षांनंतर ही आघाडी पुन्हा जुळून येत आहे, याचा मला आनंद आहे. ही संख्येची नव्हे तर विचारांची आघाडी आहे. सत्तेपेक्षा विचारांना आम्ही प्राधान्य देत आहोत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर यांनी सांगितले की, भाजपला रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. “प्रकाश आंबेडकर यांनी ऑनलाइन बैठकीत या युतीला मान्यता दिली आहे. मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी 62 जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवणार आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. कारण काँग्रेसची शरद पवार गटासोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेसने शरद पवार यांच्या पक्षाला केवळ 9 जागा देण्याची तयारी दर्शविल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस–वंचित युतीची घोषणा, ठाकरे बंधूंची युती आणि भाजपविरोधातील आघाड्यांची जुळवाजुळव यामुळे येत्या काळात मुंबईतील राजकीय संघर्ष अधिकच तीव्र होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *