मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या डबल इंजिन सरकार आहे, पण मला ते पुरेसे नाही. मला महाराष्ट्रात ट्रिपल इंजिन सरकार पाहिजे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज केले. महाराष्ट्र भाजपच्या नव्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.

शहा म्हणाले, “भाजप कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवाव्यात. जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायत आणि नगर परिषद या सर्व ठिकाणी आपले प्रशासन आणावे. विरोधकांचा असा सफाया करा की ते दुर्बिणीनेही दिसू नयेत.”
ते पुढे म्हणाले, “पक्ष कार्यालय हे आमच्यासाठी केवळ कार्यालय नसून मंदिर आहे. याच ठिकाणी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, विचार आणि संस्कार घडतात. आमचा पक्ष घराणेशाहीवर नव्हे तर लोकशाही मूल्यांवर चालतो. मी स्वतः बूथ अध्यक्ष म्हणून प्रवास सुरू करून राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापर्यंत आलो हे त्याचे जिवंत उदाहरण आहे.”
शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत म्हटले, “एका गरीब चहावाल्याच्या घरी जन्मलेला व्यक्ती आज तिसऱ्यांदा देशाचा पंतप्रधान झाला आहे. हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. देशाची जनता आज भाजपच्या स्वागतासाठी सज्ज आहे.” या कार्यक्रमास भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. अमित शहा यांच्या भाषणाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.



