भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका शाळेतील १६ वर्षीय मुलीला शाळेतून पळवून नेऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तौसिफ जहाबाद तडवी (वय २२, रा. पाल, ता रावेर) यास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री अटक केली आहे. बुधवारी न्यायालयात हजर केले असता आरोपीस १८ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी भुसावळ येथील रहिवासी असून ती शहरातीलच एका शाळेत शिक्षण घेते. ७ ऑगस्ट रोजी संशयित तडवी याने शाळेत येऊन मुख्याध्यापकांना लेखी अर्ज देत मुलीचा भाऊ असल्याचे खोटे सांगितले. मुख्याध्यापकांची दिशाभूल करून त्याने मुलीला सोबत घेतले व मुंबई, चोपडा आणि जळगाव येथे नेले. ९ ऑगस्ट रोजी जळगाव शहरातील एका हॉटेलमध्ये आरोपीने मुलीवर अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद आहे. घटनेनंतर पीडितेच्या वडिलांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार १२ ऑगस्ट रोजी रात्री आरोपीविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर काही तासातच पोलिस पथकाने आरोपीस यावल परिसरातुन अटक केली.



