पाचोरा : प्रतिनिधी
शेतमजुरीसाठी गुरुवारी सकाळी गेलेल्या अंतुर्ली बुद्रुक येथील पदमसिंह भगवान पाटील (वय २१) व पुनगाव येथील रवींद्र परभत कोळी (वय १४) या दोघांचा शेततळ्यात पाय घसरून बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक शिवारात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे दोन कुटुंबांसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील अंतुर्ली बुद्रुक येथील पदमसिंह पाटील व पुनगाव येथील रवींद्र कोळी हे सकाळी ८ वाजता घराबाहेर पडले. परंतु, हे दोघे ही दुपारपर्यंत घरी न परतल्याने ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुपारी सुमारे ४ वाजता अंतुर्ली शिवारातील एका शेततळ्यात त्यांचे मृतदेह आढळून आले. गावातील नीळकंठ पाटील व सागर पाटील यांच्या मदतीने त्यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. दरम्यान, पदमसिंह पाटील हा आपल्या विधवा आईसह राहत होता. त्यांचे वडीलांचा १० वर्षांपूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यास एक विवाहित बहीण असून तोच घराचा आधार होता. पदमसिंहच्या जाण्याने आई, बहिणीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर १४ वर्षीय रवींद्र कोळी हा आपल्या आई, वडील व दोन भावांसोबत राहत होता. लहान वयातच घरखर्चासाठी तो शेतमजुरी करत होता. त्याच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावरही मोठा आघात झाला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर पाय घसरून दोघे शेततळ्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, एका आईचा कर्ता मुलगा व दोन भावांचा आधार अशा दोन मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



