पाचोरा : प्रतिनिधी
पाचोऱ्याहून ओझरच्या दिशेने जात असलेल्या दुचाकीने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जबर धडक दिली. या अपघातात ३० वर्षीय ढोलताशे वादक तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील मयूर महेंद्र सोनवणे (वय ३०) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, मयूर हा २१ फेब्रुवारीला दुपारी खासगी कामानिमित्त दुचाकी (एमएच-१९, ईएफ- २५१७) ने पाचोऱ्याहून ओझरच्या दिशेने जात होता. दरम्यना, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या अपघातात मयूरच्या डोक्यास गंभीर इजा होवुन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. राहुल शिंपी, पो.कॉ. शरद पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर मयूर यांचा मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. त्याठिकाणी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
मयूर हा ढोलताशे वाजवून तसेच नगरपालिकेत कंत्राटी पद्धतीने काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. मयूरच्या वडिलांचे निधन झाले असून तो त्याच्या मावशीकडे वास्तव्यास होता. मयूरच्या पश्चात्य एक बहिण आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून तपास पाचोरा पोलिस करत आहेत.



