पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील कोळपिंप्री येथील दुचाकी चोरीचा गुन्हा पारोळा पोलिसांनी उघडकीस आणला असून यातील दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अभय प्रवीण पाटील (१९, कोळपिंप्री, ता. पारोळा), मयूर तुळशीदास देवरे (२२, खडकी, ता. मालेगाव) अशी या दोघा चोरट्यांची नावे आहेत.

सविस्तर वृत्त असे कि, दि. २१ जुलै रोजी रात्री ११ वाजेनंतर ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी (कोळपिंप्री) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच५४/ए२१९५) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत पारोळा पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलिस निरीक्षक सचिन सानप यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर, ही दुचाकी गावातील अभय प्रवीण पाटील व त्याचा साथीदार अशांनी चोरी केल्याचे समजले. निश्चित माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्याविरूध्द सापळा रचला. त्याबाबत त्यांनी पोलिस हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील, अनिल राठोड यांचे पथक तयार करून रवाना केले.
यातील आरोपी अभय पाटील हा अमळनेर शहरात लपून बसलेला होता. त्याच्या मोबाइल नंबरच्या आधारावर त्याला पकडण्यात आले. गुन्ह्यातील दुचाकीबाबत विचारले असता त्याने त्यांचा साथीदार मयूर देवरे यांच्याकडे असल्याचे सांगितले. मालेगाव येथे जाऊन आरोपी मयूर तुळशीदास देवरे (खडकी, ता. मालेगाव) यास ताब्यात घेऊन दोन्ही आरोपींना पोलिस स्टेशन येथे आणून विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरीतील दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.



