Home » जळगाव » नऊ वर्षांच्या मुलीच्या पायात अडकलेली पिस्तुलाची गोळी : पोलिसांकडून चौकशी सुरु

नऊ वर्षांच्या मुलीच्या पायात अडकलेली पिस्तुलाची गोळी : पोलिसांकडून चौकशी सुरु

जळगाव  : प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यातील मोहाडी येथील नऊ वर्षांची श्रावणी मोहन बागुल हिला अंगणात खेळत असताना पायात गंभीर दुखापत झाली. प्रारंभिक तपासणीमध्ये तिच्या पायात काहीतरी अडकल्याचे निदान झाले होते, पण काही दिवसांनंतर कळाले की, तिच्या पायात एक पिस्तुलाची गोळी अडकली होती. ही गोळी सात महिन्यांनी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. या प्रकरणाची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे आणि डॉक्टरांच्या लापरवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोहाडी गावात मोहन बागुल यांची मुलगी श्रावणी आणि तिच्या मैत्रिणी अंगणात खेळत होत्या. अचानक श्रावणीच्या पायात तीव्र दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. तिच्या आई-वडिलांनी तिला तत्काळ मोहाडी येथील रुग्णालयात नेले, जिथे प्राथमिक उपचार करण्यात आले. परंतु जखम अत्यंत गंभीर होती आणि रक्तस्त्राव थांबला नाही, त्यामुळे श्रावणीला जळगाव जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी घोरपड किंवा अन्य प्राण्याने चावा घेतल्याच्या शंकेने उपचार सुरू केले. सात महिन्यांपासून श्रावणीच्या पायावर उपचार केले जात होते, पण तिच्या पायात कळत-नकळत अडकलेली गोळी लक्षात घेतली गेली नाही. श्रावणीच्या पायात झालेल्या विकृतीच्या कारणांचा शोध घेण्यासाठी डॉक्टरांनी पायाचा एक्सरे घेतला आणि तिथे पिस्तुलाची गोळी अडकलेली असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर, विशेष शस्त्रक्रिया करून पिस्तुलाची गोळी श्रावणीच्या पायातून काढण्यात आली. या गोळीला जळगाव जिल्हापेठ पोलिसांनी जप्त केले असून तपास सुरू आहे. प्रारंभिक चौकशीमध्ये हे लक्षात आले की या परिसरात पोलिसांचा गोळीबार सराव रेंज आहे आणि त्याठिकाणीच ही गोळी श्रावणीला लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिवाय, जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची लापरवाही आणि उपचाराची चुकीची पद्धतही चर्चेचा विषय ठरली आहे. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोप केला आहे की डॉक्टरांनी श्रावणीच्या दुखण्याचे योग्य निदान वेळेवर केले असते, तर या गंभीर स्थितीला टाळता आले असते. एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या प्रकरणाच्या तपासाची पुढील कारवाई चालू असून, पोलिसांनी श्रावणी आणि तिच्या कुटुंबियांची चौकशी केली आहे. या घटनेने रुग्णालयात चालू असलेल्या आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभारावर प्रकाश टाकला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *