Home » राष्ट्रीय » शरद पवारांच्या पक्षात लवकरच राजकीय भूकंप : शिंदेंच्या नेत्याचा दावा !

शरद पवारांच्या पक्षात लवकरच राजकीय भूकंप : शिंदेंच्या नेत्याचा दावा !

मुंबई ; वृत्तसंस्था

गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता स्थापन झाली होती,  आता पुन्हा एकदा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात लवकरच मोठा भूकंप होणार असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे. या संदर्भात मी आधी देखील भाष्य केले होते, असा दावा त्यांनी केला आहे. जयंत पाटील हे लवकरच आपल्याला अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिसतील असे देखील ते म्हणाले. आता संजय शिरसाट यांच्या या दाव्यामुळे जयंत पाटील यांच्या पक्षांतराची चर्चा पुन्हा एकदा रंगणार आहे.

जयंत पाटील यांनी मुंबईमध्ये शेतकऱ्यांच्या मोर्चा दरम्यान केलेले वक्तव्य सध्या राज्यात चांगलेच चर्चेत आले आहे. या माध्यमातून जयंत पाटील यांच्या मनात नेमके काय सुरू आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जयंत पाटील हे शरद पवार यांची साथ सोडणार अशा चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या आधी देखील त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली होती. त्यावेळी देखील अशाच चर्चा रंगल्या होत्या. आता जयंत पाटील यांच्याबद्दल पुन्हा चर्चा रंगली आहे. त्यातच आता संजय शिरसाट यांनी केलेल्या दाव्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचा आझाद मैदानावर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट दिली होती. यावेळी जयंत पाटील यांनी मोर्चेकरांना उद्देशून भाषण केले. आपल्या भाषणात बोलताना त्यांनी खळबळजनक विधान केले. माझे काही खरे नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, असे वक्तव्य जयंत पाटील यांनी केले होते. जयंत पाटलांच्या या विधानाचा रोख काय? असा प्रश्न त्यांनतर उपस्थित केला गेला. राजू शेट्टींनी एकदा झेंडा घेतला तर ते सोडत नाहीत असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. यावेळी, शेतकऱ्यांनी तुम्ही देखील आंदोलनात हवे, अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर, माझी गॅरंटी घेऊ नका, माझे काही खरे नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. त्यावर, अनेकांनी भुवया उंचावल्या तसेच त्यांच्या बोलण्याचा रोख काय होता? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *