नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभेच्या कामकाजात शासकीय विधेयक मांडणे सुरू असताना भाजप आमदार सुरेश धस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांच्यात वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. तसेच यात सुरेश धस यांनी आमदार रोहित पवारांच्या मतदारसंघाच्या नावाचे उल्लेख केल्याने रोहित पवारांनी आक्षेप घेतला. असा तिघांमध्ये शाब्दिक वाद रंगला होता.

विधानसभेत बोलताना भाजप आमदार सुरेश म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार असताना सर्वाधिक टार्गेट झालो मी. माझ्यावर आणि माझ्या कार्यकर्त्यांवर 30-30 गुन्हे दाखल करण्यात आले होते. डीवायएसपी यांनी जेव्हा चौकशी केली तेव्हा माझे नाव कुठेच आले नाही. पुन्हा माननीय गृहमंत्री अनिल देशमुख असताना एक एसआयटी स्थापन करण्यात आली, त्यात सुद्धा माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे नाव आले नाही. नंतर माझ्याबाबतीत जो प्रकार वापरला गेला कलम 17 अन्वये एसीबीच्या चौकशीच्या बाबतीत लोकप्रतिनिधीची चौकशी या विभागाने दिल्याशिवाय होत नाही.
पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले, बाळासाहेब थोरात साहेबांनी माझ्या विरोधातल्या या चौकशीला परवानगी दिली नाही. त्यानंतर माझ्यावर हायकोर्टात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार एसीबीची सुद्धा चौकशी करण्यात आली. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांचा काही संबंध नाही, पण राष्ट्रवादीच्या लोकांनी एसीबीची सुद्धा चौकशी लावली होती. त्यात सुद्धा माझा काही संबंध आढळून आला नाही. जयंत पाटील जे सांगत आहेत, अहिल्यानगरच्या रोहित दादा पवारांच्या मतदारसंघात कुठेतरी स्पेशल डुकराचे मटन मिळते आणि त्या ठिकाणी दारूच्या धंद्यावरती आणि डुकराचे मटन मिळते तिथे मारामाऱ्या झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी सुरू करायचे की सुरेश धसांनी हाणामारी केली. सुरेश धस यांनी हे म्हटल्यावर आमदार रोहित पवारांनी यावर आक्षेप घेतला.
सुरेश धस यांचे बोलणे झाल्यावर रोहित पवार म्हणाले, माझ्या मतदारसंघाचे नाव या ठिकाणी घेतले. जामखेड ही भूमी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांची भूमी आहे, संत श्री सीताराम बाबांची कर्मभूमी आहे. आणि इथे बोलत असताना धस साहेबांनी जो उल्लेख केला डुकराच्या मटणाचा हे अयोग्य आहे. उदाहरण द्यायचे असेल तर तुम्ही कुठलेही द्या, मतदारसंघाचे नाव घेण्याची गरज नव्हती. यावर सुरेश धस यांनी मी माझे शब्द परत घेतो असे म्हटले.



