Home » महाराष्ट्र » महायुतीतील बंडखोरीमुळे जळगाव मनपा निवडणुकीत धक्क्याची शक्यता !

महायुतीतील बंडखोरीमुळे जळगाव मनपा निवडणुकीत धक्क्याची शक्यता !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीला सुरुवातीला मोठा दिलासा मिळाला असून तब्बल १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, त्यानंतरच्या थेट लढतींमध्ये महायुतीसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. महायुतीतील अंतर्गत बंडखोरी आणि नाराज कार्यकर्त्यांमुळे येत्या निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

बहुतेक प्रभागांमध्ये आता महायुती व महाविकास आघाडीतील उमेदवारांमध्ये थेट लढत होत असली, तरी महायुतीतील काही इच्छुकांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने किंवा बंडखोर भूमिका घेतल्याने मतविभागणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाने उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रचारात निष्क्रिय भूमिका घेतली असून काही ठिकाणी उघडपणे विरोधही सुरू असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे, महाविकास आघाडीने या बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी रणनीती आखली असून, प्रभागनिहाय समन्वय वाढवून जोरदार प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे बिनविरोध मिळालेल्या जागांचा फायदा मर्यादित ठरणार की काय, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे. एकूणच जळगाव मनपा निवडणूक आता केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी इतकीच न राहता, महायुतीसाठी अंतर्गत एकजूट राखण्याचे मोठे आव्हान बनली असल्याचे चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *