पुणे : वृत्तसंस्था
येत्या आठवड्यात दिवाळी सण येत असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण सुरु झाले असून प्रत्येक व्यक्ती सणाच्या तयारी करू लागला आहे. पुरंदर तालुक्यात झेंडू फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यावर्षी मान्सूनपूर्व आणि मान्सून समाधानकारक पडल्याने पाणीच पाणी झाले आहे; ओढे-नाले, बंधारे व तलाव भरले आहेत. शेतीसाठी मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने अनेक गावांत झेंडूची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. मात्र दसरा सणानंतर रब्बी हंगामातील पिकांसाठी अनेक शेतकऱ्यांनी झेंडूच्या बागा काढून टाकल्याने दिवाळीत झेंडू फुलांचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे दिवाळीतही झेंडूला चांगला बाजारभाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
पुरंदर तालुक्यात यंदा झेंडूच्या लागवडीत वाढ झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. यावर्षी 156.5 हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड झाली आहे, तर मागील वर्षी ती फक्त 139.2 हेक्टर होती. म्हणजेच मागील वर्षापेक्षा 17.3 हेक्टर अधिक झेंडू लागवडीत आले आहेत. दसऱ्याच्या वेळी झेंडूच्या फुलांना प्रतिकिलो 80 ते 100 रुपये भाव मिळाले होते. रब्बीसाठी झेंडू काढल्यामुळे बाजारात पुरवठा कमी राहिला आहे, त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे.
यंदा झेंडूचे उत्पादन काहीसे कमी झाले असून फुलांचा आकार लहान आहे. काही ठिकाणी फुलांवर जास्त पावसाचा फटका बसला, पण तुलनेने बाजारभाव चांगला असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. ’दसऱ्याच्या वेळी भाव चांगला होता. आता दिवाळीतही फुलांना चांगला बाजार मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत,’ असे शेतकरी संतोष शेटे, विजय जगताप, रामदास भोसले आणि अविनाश कदम यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी यंदा झेंडूच्या लागवडीसाठी पाणी व्यवस्थापनावर विशेष लक्ष दिले. काही शेतकऱ्यांनी बंधारे आणि ओढ्यांवर पाणी साठवून, झेंडूच्या पिकासाठी वेळोवेळी सिंचन केले. यामुळे फुलांची गुणवत्ता जास्त चांगली राहिली. दिवाळीचा बाजार हळूहळू सुरू होत आहे आणि फुलांची मागणी वाढत आहे. दिवाळीच्या शुभमुहूर्तानिमित्त बाजारात झेंडूची मागणी वाढते, विशेषत: लक्ष्मीपूजनासाठी. त्यामुळे या सणाच्या वेळी झेंडू शेतकऱ्यांसाठी मुख्य उत्पन्नाचे साधन ठरु शकते.
