Home » महाराष्ट्र » कामांवर मत मागण्याऐवजी पैशाचे आश्वासन ; शरद पवारांचे महायुती सरकारवर घणाघात !

कामांवर मत मागण्याऐवजी पैशाचे आश्वासन ; शरद पवारांचे महायुती सरकारवर घणाघात !

पुणे : वृत्तसंस्था

महाराष्ट्राच्या तिजोरीवरील नियंत्रणाच्या मुद्द्यावरून महायुतीतील तीनही पक्षांत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट टीका केली आहे. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी निधी वाटपाच्या स्पर्धेतून मतांची मदार बदलत चालल्याचा आरोप केला. कामांवर मत मागण्याऐवजी पैशाचे आश्वासन देण्याची स्पर्धा सुरु झाली आहे, हे राजकारण योग्य दिशेला जात नाही, असे त्यांनी सांगितले.

महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरही त्यांनी भाष्य केले. नगरपालिकांच्या निवडणुकीत राजकारण कमी असावे अशी आपली भूमिका असतानाही यावेळेस ठिकठिकाणी विचित्र राजकीय समीकरणे दिसत असल्याचे ते म्हणाले. एका पक्षाची दुसऱ्यासोबत हातमिळवणी ही महायुतीत एकमत नसल्याचे चिन्ह असून याचा अंतिम निर्णय जनता देईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीबाबत बोलताना पवार म्हणाले की, ५० टक्के आरक्षण मर्यादेवर न्यायालय ठाम असल्याने निकाल कोणत्या दिशेने जाईल याबद्दल अनिश्चितता आहे. निकाल दोन-तीन दिवसांत अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

अतिवृष्टी व पूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने दिलेली मदत अपुरी असल्याचीही पवारांनी टीका केली. कर्जवसुलीला एक वर्षाची स्थगिती हा तात्पुरता दिलासा असून, व्याजमाफी आणि योग्य रकमेची मदत दिल्यासच शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळेल, अशी मागणी त्यांनी केली.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *