पुणे : वृत्तसंस्था
पिंपरी-चिंचवड शहरात स्पा सेंटर्स व लॉजच्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या धडक मोहिमेत शहरातील विविध ठिकाणांहून एकूण आठ महिलांची सुटका करण्यात आली आहे.

विशालनगर येथील इंटरनल फॅमिली स्पामधून चार, निगडी येथील ईगल स्पामधून दोन, तर कृष्णा लॉज आणि आळंदी येथील योगीराज लॉज येथून प्रत्येकी एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त विनायक कुमार चौबे यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पोलिस उपायुक्त शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने ही मोहीम राबवली. पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी पथकाचे नेतृत्व केले.
वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंटरनल फॅमिली स्पावर रात्री दहा वाजता धाड टाकून चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी स्पा व्यवस्थापक अब्दुल मोहम्मद हुसेन कलाम याला अटक करण्यात आली असून, संबंधित महिला व व्यवस्थापकाविरुद्ध ‘पीटा’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे. निगडी येथील ईगल स्पा तसेच कृष्णा लॉज आणि आळंदीतील योगीराज लॉजवरही पोलिसांनी छापे टाकून पीडित महिलांची सुटका केली. अधिक पैशांचे आमिष दाखवून तसेच दबाव व जबरदस्तीने महिलांना या अनैतिक व्यवसायात ढकलले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, शहरातील अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कठोर भूमिका घेतली असून, गेल्या एका महिन्यात तीन आस्थापनांवर एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. यात चिंचवडमधील निक्की लॉज, काळेवाडीतील लेमन ग्रास थाई स्पा आणि सांगवी येथील औराथाई स्पा यांचा समावेश आहे. पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२५ या वर्षात आतापर्यंत २५ स्पा सेंटर्सवर कारवाई करण्यात आली असून ‘पीटा’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. या कारवाईत ४५ आरोपींना अटक करण्यात आली असून ६३ पीडित महिलांची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे.



