Home » ताज्या » पुढील २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात कोसळणार पाऊस !

पुढील २४ तासात राज्यातील अनेक जिल्ह्यात कोसळणार पाऊस !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाची तीव्रता कमी झाली असली तरी, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर विदर्भात वादळाची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी सावध राहण्याचा आणि स्थानिक सूचनांचे पालन करण्याचा सल्ला प्रशासनाच्या वतीने‎ देण्यात आला आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात मागील दिवसांच्या तुलनेत पावसाची तीव्रता कमी झाली आहे.

मुंबईत मुसळधार पावसानंतर दिलासादायक बातमी आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे आणि अरबी समुद्रात तयार झालेले चक्रीवादळ गुजरातकडे वळत आहे. अशा परिस्थितीत, पुढील काही दिवस महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबई, पुणे, मराठवाडा आणि विदर्भ येथील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. राज्यभरात अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले. अनेक ठिकाणी घरे कोसळली आणि अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे शाळांनाही सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या होत्या.

पश्चिम महाराष्ट्र : पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या सरी पडू शकतात, घाट माथा भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागांसाठी कोणताही विशिष्ट इशारा जारी केलेला नाही.

विदर्भ : नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये वादळ, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *