Home » राष्ट्रीय » बाप्पाच्या आगमनापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार !

बाप्पाच्या आगमनापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या चार दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबई आणि पश्चिम उपनगरात पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज (25 ऑगस्ट) सकाळपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असून, काही भागांत जोरदार सरी कोसळत आहेत. यामुळे दृश्यमानता कमी झाली असून, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने मुंबईसह कोकणासाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी बाहेर पडण्यापूर्वी नागरिकांनी हवामान अपडेट तपासण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

पश्चिम उपनगरातील अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले आणि सांताक्रुझ या परिसरात पहाटेपासून अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. गेल्या 10-15 मिनिटांपासून या भागांत पावसाचा जोर वाढला आहे. जर असाच पाऊस काही काळ सुरू राहिला, तर सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता आहे. पूर्व उपनगरात पावसाची उघडझाप सुरू असून, सध्या तिथे पाऊस थांबला आहे. नवी मुंबईत संततधार पाऊस सुरू आहे, तर ठाण्यात मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने सकाळी काहीशी विश्रांती घेतली आहे.

हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी 26 आणि 27 ऑगस्टसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. आजपासून पुढील चार दिवस मुंबईत हलक्या ते मध्यम सरींसह अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे. तापमान 27 ते 31 अंश सेल्सिअस दरम्यान राहील, तर आर्द्रतेमुळे उकाडा जाणवेल. वाऱ्याचा वेग 25-30 किमी प्रतितास राहण्याचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, जिथे मध्यम ते जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. समुद्राला भरती येण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

हवामान विभागाने (IMD) कोकणातील रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी 25 ते 28 ऑगस्ट 2025 दरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या भागांत 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे, तर विजांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळतील.

पुणे, कोल्हापूर आणि सातारा येथील घाटमाथ्यावर 25 आणि 26 ऑगस्टला मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या भागांसाठी ‘मॉडरेट रेन’ स्टेटस जाहीर केलं असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर काही ठिकाणी जास्त, तर काही भागात ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळेल. धुळे आणि नाशिकमध्ये 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे

मराठवाड्यातील परभणी, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस (25-28 ऑगस्ट) हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्टही जारी करण्यात आला आहे. मात्र, मराठवाड्यात यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता कायम आहे. राज्यात पावसाचा जोर काही दिवसांपासून कमी झाला असून अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, घाटमाथ्यावर पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहील. आठवड्याभरापूर्वी झालेल्या पावसामुळे बऱ्यापैकी धरणं भरली असून पाण्याची चिंता मिटली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *