Home » महाराष्ट्र » भागवतांच्या कार्यक्रमावर राज ठाकरेंची टीका, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंनाही डिवचले

भागवतांच्या कार्यक्रमावर राज ठाकरेंची टीका, नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंनाही डिवचले

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० व्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित दोन दिवसीय व्याख्यानमालेवरून राज्यातील राजकारण तापले आहे. या व्याख्यानमालेदरम्यान संघप्रमुख मोहन भागवत यांनी केलेल्या भाषिक वादावरील वक्तव्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे आक्रमक झाले असून, त्यांनी सोशल मीडियावरून तीव्र शब्दांत टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी पोस्टद्वारे, “मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की, तुमच्या कार्यक्रमाला आलेली मंडळी तुमच्या प्रेमाखातर आलेली नव्हती, तर नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती. अन्यथा आजवर या असल्या रटाळ प्रवचनांना कोणी आले नाही. त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती, या गैरसमजातून आधी बाहेर या,” अशी घणाघाती टीका केली.

राज ठाकरेंच्या या वक्तव्याला भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केले. नितेश राणे म्हणाले, “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने उपस्थित राहण्याची हिंमत दाखवली. उद्धव ठाकरेंपेक्षा सलमान खान जास्त हिंदू निघाला.”

पुढे बोलताना नितेश राणे यांनी, “राहुल गांधींसमोर उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना ‘हिंदूहृदयसम्राट’ म्हणण्याचीही हिंमत दाखवू शकत नाहीत,” असा टोला लगावला. राज ठाकरे यांच्यावरही टीका करताना नितेश राणे म्हणाले, “रटाळ प्रवचनांमध्ये उद्धव ठाकरेंनी पीएचडी केली असती. राज ठाकरेंना योग्य दिशा आणि वैचारिक बळ मिळालं असतं, तर रटाळ बोलण्याऐवजी त्यांनी बौद्धिक चर्चा केली असती आणि इतकी लोकं त्यांना सोडून गेली नसती.” आरएसएसच्या व्याख्यानमालेवरून सुरू झालेला हा वाद आता थेट राजकीय आरोप–प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला असून, आगामी काळात याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *