रावेर : प्रतिनिधी
शहरातील दुचाकी चोरणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १३ लाख १० हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी कोरपावली येथून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांना रावेर शहरातील चक्क ९५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासावे लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव दत्तात्रय तायडे (२०), तौसिफ तैय्यब आणि अब्दुल रहेमान तैय्यब पटेल (तिन्ही रा. कोरपावली, ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातील सराफा व्यावसायिकांची दुचाकी रावेर शहरातील स्वामी नारायण मंदिरजवळून चोरट्यांनी लंपास केल्याप्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरट्यांनी ही चोरीची दुचाकी शिरपूर येथे विकून चोरटे चोपडा येथे पोहचल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
यानंतर रावेरचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या पथकाने चोपड्यात तपास केला असता हे तीनही संशयित कोरपावलीकडे पळाले. पोलिसांनी कोरपावली येथील त्यांच्या घरून त्यांना अटक केली.
या पथकात पोहेकॉ. ईश्वर चव्हाण, कल्पेश आमोदकर, रूबाब तडवी, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, विशाल पाटील, सुकेश तडवी, विकार शेख, तथागत सपकाळे, गजानन बोने यांचा समावेश होता. या तीनही संशयितांना रावेर न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. चोरीच्या दुचाकींच्या विक्रीसाठी बोगस आरसी बुक बनवून देणाऱ्यांचा पोलिस शोध घेत आहेत.



