Home » राष्ट्रीय » रोहित पवारांची पोस्ट व्हायरल : …तर बळीराजा खतरे में है !

रोहित पवारांची पोस्ट व्हायरल : …तर बळीराजा खतरे में है !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मराठवाड्यातील अनेक भागांत रविवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा कहर केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील परंडा, बीडमधील पाटोदा, शिरूर, जालना शहर यासह बहुतांश भागांत मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून ग्रामीण भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवारांनी ‘आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता ओला दुष्काळ जाहीर करा,’ अशी मागणी केली आहे.

रोहित पवार यांची पोस्ट –

रोहित पवार यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत लिहिले की, “अतिवृष्टीने राज्यात भयावह परिस्थिती निर्माण झाल्याने मायबाप सरकारला सांगायचंय, आज जाती-धर्मात वाद करण्यापेक्षा हिंदू, मुस्लिम, ओबीसी, एससी, एसटी या सर्वच समाजाचे शेतकरी अडचणीत आहेत. म्हणूनच राजकारण बाजूला ठेवून माणुसकी धर्माला आणि महाराष्ट्र धर्माला जागून शेतकऱ्याला तातडीने मदत करण्याची नितांत गरज आहे. आधी अवकाळी आणि आता अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं अक्षरशः कंबरडं मोडलंय.”

‘हीच योग्यवेळ कर्जमाफीही जाहीर करा’

“शेतीचं झालेलं नुकसान बघितलं तर शेतकऱ्यांना निकषापेक्षा कितीतरी जास्त मदत करण्याची गरज आहे. आज हिंदू नाही तर बळीराजा खतरे में है..! अशा परिस्थितीत आता पंचनाम्याचा हट्ट न धरता आजच्या कॅबिनेट बैठकीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदतीची घोषणा करा आणि हीच योग्यवेळ असल्याने कर्जमाफीही जाहीर करा, ही आक्रोश करणाऱ्या बळीराजाच्यावतीने कळकळीची विनंती,” असे रोहित पवारांनी ट्वीट करत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन राज्य सरकारला केले आहे.

जामखेड तालुक्यातील सीना नदीच्या काठावर वसलेल्या या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे. पाणी शेतांत घुसल्याने पिके उद्ध्वस्त झाली असून, गावांचा संपर्क तुटण्याची भीती आहे. स्थानिक प्रशासनाने एनडीआरएफ आणि स्थानिक मदत दलांना सतर्क करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांनी आपला माल आणि कुटुंब सुरक्षित स्थळी हलवावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. मागील काही दिवसांत मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने परिसरातील पूल आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *