जळगाव : प्रतिनिधी
तीन वर्षीय बालकाला उचलून नेत असल्याच्या संशयावरून ३० ते ३५ वर्षीय अनोळखी तरुणाला जमावाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील आव्हाणे शिवारात घडली. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना दि. २३ रोजी रात्री आव्हाणे शिवारातील लक्ष्मी जिनिंगजवळ घडली. मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जळगाव) हे जिनिंग परिसरात वास्तव्यास आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास एका अनोळखी तरुणाने त्यांच्या तीन वर्षीय मुलाला उचलून नेत असल्याचा संशय त्यांना आला. या संशयावरून मनोहर सोनवणे यांनी परिसरातील १५ ते २० जणांना बोलावले.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर जमावाने त्या अनोळखी तरुणाला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच एका व्यक्तीने काठीने डोक्यावर व शरीरावर वार केल्याचे सांगितले जाते. या मारहाणीत तरुणाच्या डोक्याला, हातापायांना व डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली. तो जिनिंगजवळ रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी रामकृष्ण इंगळे, गुलाब माळी, धनराज पाटील, विजय निकम, कैलास इंगळे व श्रीकांत बदर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गंभीर जखमी अवस्थेतील तरुणाला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला.
मृत्यूची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी संशयित मनोहर भगवान सोनवणे (रा. नांद्रा खुर्द, ता. जळगाव), अजय डोंगर कोळी (रा. थोरगव्हाण, ता. यावल, ह.मु. लिंबायत, सुरत), प्रशांत उर्फ प्रकाश शशिकांत सोनवणे, अजय उर्फ बादल शशिकांत सोनवणे (दोन्ही रा. बामणोद, ता. यावल) व अफताब आरीफ खाटीक (रा. कुंभारवाडा, शनिपेठ, जळगाव) यांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अफवांवर विश्वास ठेवून कायदा हातात घेण्याचे प्रकार धोकादायक ठरत असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.



