Home » जळगाव » दक्षता पेट्रोलपंपावर कोटींचा घोटाळा; उपनिरीक्षक फरार, शोधमोहीम तीव्र

दक्षता पेट्रोलपंपावर कोटींचा घोटाळा; उपनिरीक्षक फरार, शोधमोहीम तीव्र

जळगाव : प्रतिनिधी

जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावर व्यवस्थापकाची जबाबदारी पोलीस उपनिरीक्षकांकडे दिली होती. या उपनिरीक्षकाने तब्बल १ कोटी ३३ लाख रुपयांचा अपहार केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. याप्रकरणी व्यवस्थापक पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक मधुकर वाघ (५७, रा. साईनगर, निमखेडी शिवार) यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित उपनिरीक्षक पसार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस दलाच्या मानव संसाधन विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या भास्कर मार्केट समोरील दक्षता पेट्रोलपंपाच्या दैनदिन आर्थिक व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ यांच्याकडे व्यवस्थापक म्हणून सोपवण्यात आली होती. याठिकाणी दररोज पेट्रोल, डिझेल विक्रीतून जमा होणारी रोख रक्कम दररोज बँक खात्यात जमा करणे आणि त्याचे अचूक रेकॉर्ड ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. तसेच त्यांनी सोपविण्यात आली होती. दि. १२ फेब्रुवारी रोजी वाघ यांचा मुलगा शेखर वाघ याने जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन वडील कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाले आहे पेट्रोलपंपाच्या हिशोबात मोठी गडबड झाली असून मी त्यात पूर्णपणे अडकलो असल्याचे पत्राद्वारे कळविल्याचे सांगितले.

या माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षकांनी तात्काळ पेट्रोलपंपावरील व्यवहारांची खात्री करण्याचे आदेश मानवसंसाधन विभागाचे प्रभारी संदीप पाटील यांना दिले. तपासणीवेळी पेट्रोलपंपाच्या तिजोरीत केवळ १ लाख ९६ हजार २१९ रुपये आढळले. मात्र बँकेत भरणा केल्याचे पावती पुस्तक व इतर दस्ताऐवज तेथे नव्हते. त्यामुळे पंपाचे लेखापरीक्षण करण्याचेही आदेश देण्यात आले. प्रकरणी प्रभारी संदीप पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून वाल्मीक वाघ याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम ३१६ (५) (लोकसेवकाद्वारे फौजदारी विश्वासघात) आणि कलम ३१८(४) (फसवणूक) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.

लेखापाल एस. आर. पलोड यांनी दि. १ एप्रिल २०२५ ते दि. ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीचे लेखापरीक्षण केले. यामध्ये त्यांना एकूण ४ कोटी ९३ लाख ७३ हजार ६८६ रुपयांची रोख विक्री झाली व त्यापैकी ३ कोटी पये बँकेत प्रत्यक्ष ५९ लाख २५ हजार १८ रुपये जमा केले. मात्र उर्वरीत १ कोटी ३३ लाख ७५२ रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले. पंपावरील रोख रक्कम वेळोवेळी बँकेत भरणा करण्याबाबत वाल्मीक वाघ यांना प्रभारींनी सूचना देण्यासह रोखवही व भरणा पावती पुस्तक दाखविण्याविषयी सांगितले. मात्र प्रत्येक वेळी वेगवेगळे बहाणे करून रेकॉर्ड दाखविण्यास टाळाटाळ करीत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. वाघ हे सध्या पसार असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या मालमत्ता जप्तीची प्रक्रियादेखील तांत्रिक पुराव्यांच्या आधारे सुरू करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *