September 21, 2026 11:30 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » महामार्गावर ई-बस जळून खाक; प्रवाशांचा थरारक बचाव

महामार्गावर ई-बस जळून खाक; प्रवाशांचा थरारक बचाव

मुंबई : वृत्तसंस्था 

मुंबईची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या ‘बेस्ट’च्या ताफ्यातील 289 क्रमांकाच्या इलेक्ट्रिक बसला मंगळवारी संध्याकाळी कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागली. साईधाम मंदिर परिसरात घडलेल्या या घटनेत सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बस दामू नगर परिसरातून प्रवाशांना घेऊन बोरिवलीच्या दिशेने निघाली होती. बस अंधेरीकडून बोरिवलीकडे जात असताना अचानक बसमधून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. ही घटना कांदिवली येथील साईधाम मंदिराजवळ घडली.

घटनेच्या वेळी बसमध्ये मोठ्या संख्येने प्रवासी होते. आगीची चाहूल लागताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली; मात्र चालक व वाहक यांच्या प्रसंगावधानामुळे सर्वांना तत्काळ बसमधून खाली उतरवण्यात आले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दरम्यान, संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी आग लागल्यामुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. कांदिवली, मालाड, गोरेगाव आणि जोगेश्वरी दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालकांना दीर्घकाळ वाहतुकीत अडकून पडावे लागले.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले; मात्र तोपर्यंत बस पूर्णपणे जळून खाक झाली होती. आग नेमकी शॉर्ट सर्किटमुळे लागली की अन्य तांत्रिक बिघाडामुळे, याचा तपास अग्निशमन दल आणि समता नगर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेनंतर इलेक्ट्रिक बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, प्रवासी सुरक्षेबाबत अधिक काटेकोर उपाययोजना करण्याची मागणी पुढे येत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!