मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारला लाडकी बहिण योजना सत्ता येण्यासाठी महत्वाची ठरली होती. आता ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहिण’ योजनेत 164 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. बोगस लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत, सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हा घोटाळा होणे शक्य नसल्याचा थेट सवाल उपस्थित केला आहे.

सध्या लाडकी बहीण योजनेसाठी काही अटी आणि शर्ती लागू करण्यात आल्या. पण सुरुवातीच्या अनागोंदीमुळे या योजनेत लाडक्या भाऊरायांनी घुसखोरी करत 1500 रुपयांचे अनेक हप्ते गुपचूप पचवले. पण आता ई-केवायसी आणि खात्यांच्या तपासणीत धक्कादायक खुलासे समोर येत आहे. या योजनेत थोडा थोडका नव्हे तर 164 कोटींचा महाघोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे. यावरून याप्रकरणी आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत महायुती सरकारवर गंभीर आरोप केलेत.
बोगस लाभार्थ्यांनी सरकारच्या लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत १६४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची बातमी ऐन दिवाळीत बाहेर येतेय. सरकारी यंत्रणेच्या वापराशिवाय आणि राजकीय वरदहस्त असल्याशिवाय हे घडणं शक्य तरी आहे का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय. योजनांच्या नावाखाली जनतेच्या पैशांवर डल्ला मारणे आणि सरकारी तिजोरी रिकामी करणे ही भाजपा-मिंधे गटाची जुनी खोड असून, मुंबई महानगरपालिकेतही तेच सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. या घोटाळ्यामुळे सामान्य जनतेचा पैसा कसा लुटला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
एका बाजूला सणासुदीच्या काळात जनतेच्या पैशांची अशी लूट सुरू असताना, दुसरीकडे राज्यातील शेतकरी मात्र मदतीविना अंधारात असल्याबद्दल आदित्य ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल, असे खोटे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीही पडले नाही, असे ते म्हणाले. सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, जनता सगळे पाहत आहे आणि योग्य वेळी त्याची नोंदही ठेवेल, असा सज्जड इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.



