धाराशिव : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षापासून आरक्षणाचा वाद सुरु असतांना आता बंजारा समाजातील एका तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना मुरूम शहरात घडली आहे. नाईक नगर तांडा येथील पवन गोपीचंद चव्हाण (वय 32) असे मृत तरुणाचे नाव आहे.

या घटनेपूर्वी पवनने लिहिलेल्या चिट्ठीत ”मुख्यमंत्री साहेब बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट प्रमाणे अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्या,” असा उल्लेख त्याने स्पष्टपणे केला आहे. घटनेची माहिती मिळताच बंजारा समाजातील मोठा जमाव घटनास्थळी एकत्र जमला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, पवनने लिहिलेली चिट्ठी जप्त करून त्यावरून फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.



