पुणे : वृत्तसंस्था
शहरातील खराडी परिसरात एका उच्चभ्रू गेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल रेव्ह पार्टीवर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकत पाच जणांना अटक केली आहे. ‘स्टे बर्ड’ नावाच्या गेस्ट हाऊसमध्ये सुरू असलेल्या या पार्टीदरम्यान, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिला, तीन पुरुषांचा समावेश असून, एकनाथ खडसेंच्या जावयाचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. रॅडीसन हॉटेलच्या मागे असलेल्या गेस्ट हाऊसमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. बनसोडे नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या या गेस्ट हाऊसवर पोलिसांनी छापेमारी केली. त्यावेळी मोठ्या आवाजात संगीत सुरू होते आणि उपस्थित लोक अंमली पदार्थांचे सेवन करत होते. पोलिसांनी सर्वांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्के जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा स्रोत आणि पुरवठादार यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे.
या पार्टीत सहभागी झालेल्यांमध्ये एका महिला आमदाराच्या पतीचा आणि एकनाथ खडसेंच्या जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल केवळकर यांचा समावेश असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच, प्रसिद्ध बुकी निखिल पोपटानी याचेही नाव यात जोडले जात आहे, त्यामुळे या कारवाईने राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.
दरम्यान,अशा प्रकारच्या रेव्ह पार्टीमुळे पुणे शहरातील अमली पदार्थांचे रॅकेट अधिक सक्रिय झाल्याचे चित्र समोर येत आहे. पुणे शहरातील वाढत्या अंमली पदार्थांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. रेव्ह पार्टीच्या या घटनेमुळे खराडी परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेमुळे शहरातील अंमली पदार्थांची साखळी आणि परिसरातील सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.



