जळगाव : प्रतिनिधी
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका अवैध कुंटणखान्यावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा खुलासा केला आहे. या कारवाईत कुंटणखाना चालवणारी एक महिला आणि दोन पुरुष अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनास्थळी पाच पीडित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

एमआयडीसी परिसरातील नीलंबरी हॉटेलच्या मागे व हॉटेल सुमेरसिंगच्या समोर असलेल्या एका ठिकाणी अवैध देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष (AHTU) पथकाने संबंधित ठिकाणी अचानक छापा टाकला. या छाप्यात देहविक्री व्यवसायात सक्रिय असलेली एक महिला आरोपी व दोन पुरुष आरोपी रंगेहाथ पकडण्यात आले.
छाप्यादरम्यान घटनास्थळी पाच पीडित व्यक्ती आढळून आल्या असून, त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन त्यांच्याबाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पीडितांचे समुपदेशन व पुनर्वसन प्रक्रियेबाबतही पोलीस प्रशासनाकडून पावले उचलली जात आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गनापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात AHTUच्या API योगिता नरखेडे यांच्यासह उपविभागीय कार्यालयातील पोलीस कॉन्स्टेबल अवेश शेख, प्रणय पवार, रवींद्र जाधव, रवींद्र मोतीराया, निलेश जगताप आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास केला जात आहे.



