Home » जळगाव » विधानसभेत OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न ; भाजपचे माजी मंत्री आक्रमक !

विधानसभेत OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न ; भाजपचे माजी मंत्री आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी OYO हॉटेल्सबाबत गंभीर आरोप केले आहेत. अनेक ठिकाणी ओयोशी संलग्न असलेल्या हॉटेल्समध्ये केवळ एका तासासाठी खोली भाड्याने का मिळते? याचा पोलिस विभागाने अभ्यास करावा, अशी मागणी सुधीर मुनगंटीवार यांनी

OYO ही हॉटेल चेन देशभरातील तसेच महाराष्ट्रातील विविध पर्यटनस्थळांवर आपली सेवा पुरवते. अनेक पर्यटक या हॉटेल्स आणि लॉजिंग सुविधांचा वापर करतात. मोठमोठ्या शहरांमध्येही अनेक हॉटेल्स OYO सोबत जोडलेली आहेत. मात्र, आता भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या OYO हॉटेल्सचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला आहे.

“एक OYO नावाची हॉटेल चेन तयार झाली आहे. मी येताना बघितले की शहराच्या 20-20 किलोमीटर बाहेर एका निर्जन ठिकाणी OYO हॉटेल दिसते. मनात शंका आली की हे OYO हॉटेल चेन काय आहे. या अतिशय गंभीर बाबीकडे सरकारने लक्ष देण्याची गरज आहे. या OYO हॉटेलसाठी कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेची परवानगी घेतली जात नाही”, असे मुनगंटीवार विधानसभेत आपल्या भाषणादरम्यान म्हणाले.

“या हॉटेलमध्ये एक तासासाठी खोली भाड्याने दिली जाते. ती कशासाठी दिली जाते? हा पोलिस विभागाच्या अभ्यासाचा विषय आहे. OYO च्या हॉटेलमध्ये 20-20 किलोमीटर जाऊन कुणीही प्रवासी राहात नाही. कारण हा प्रवासी जर तिथपर्यंत जात असेल, तर त्याचे अर्थशास्त्र कच्चे आहे. कारण जाण्या-येण्याच्या टॅक्सीला जितका खर्च येतो, त्यापेक्षा शहरातल्या एका हॉटेलमध्ये राहणे जास्त परवडते. पण ते लोक OYO मध्ये जातात”, असे गणित यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी मांडले.

“खरंतर महाराष्ट्रात संस्कृतीरक्षकांचे सरकार आहे. इथे जर संस्कृतीचा ऱ्हास होत असेल, तर गृहराज्यमंत्र्यांनी OYO चा अभ्यास करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात किती OYO हॉटेल आहेत, याची माहिती त्यांनी देण्याची गरज आहे”, असेही त्यांनी नमूद केले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान मुनगंटीवार यांनी ओयो हॉटेलचा मुद्दा उपस्थित केला आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *