पुणे : वृत्तसंस्था
पुण्यात भूतान देशाची नागरिक असलेल्या 27 वर्षीय तरुणीवर सात जणांकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिला ही मूळची भूतान या देशाची असून २०२० मध्ये ती भारतात असलेल्या बोध गया येथे आली होती. त्यानंतर तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत झाली. ऋषिकेशने त्या पीडित महिलेची ओळख त्याचा मित्र शंतनू कुकडे याच्यासोबत करून दिली. कुकडेने पीडित महिलेला पुण्यात एक घर दिले. याच ओळखीचा फायदा घेत शंतनु कुकडेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

सविस्तर वृत्त असे कि, राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता शंतनू कुकडे याच्यावर काही दिवसांपूर्वी दोन तरुणींनी लैंगिक अत्याचारप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. शंतनु कुकडे याला अटक केल्यानंतर पोलिस तपासात कुकडे याने त्याच्या अन्य साथीदारांसह भूतान येथून आलेल्या अजून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी वकिलांसह सहा जणांना अटक केली आहे. ऋषिकेश गंगाधर नवले (वय ४८), प्रतीक पांडुरंग शिंदे (वय ३६), विपीन चंद्रकांत बीडकर (वय ४८), सागर दशरथ रासगे (वय ३५), अविनाश नोएल सूर्यवंशी (वय ५८) आणि मुद्दसीर इस्माईल मेमन (वय ३८) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींना अटक करून मंगळवारी (दि. ८) न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान, सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सरकारी वकील नीलिमा इथापे यादव म्हणाल्या की, पीडित महिला भूतान देशाच्या नागरिक असून, त्या नोकरीच्या शोधात पुण्यात आल्या होत्या. त्या निराधार आणि असहाय्य्य असताना आरोपींनी त्यांचा गैरफायदा घेऊन जबरदस्तीने त्यांच्या इच्छेविरुद्ध शरीसंबंध ठेवले.
पीडितेने आरोपींच्या नावानिशी तक्रार दिली आहे. आरोपी हे एकमेकांचे मित्र असून, त्यांना गुन्हा करण्यास कुणी प्रवृत्त केले, तसेच दाखल गुन्ह्यात त्यांचे इतर कुणी साथीदार आहेत का, याचा तपास करायचा आहे. गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची वैद्यकीय चाचणी करायची आहे, त्यामुळे आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी अॅड. इथापे यादव यांनी केली. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली.
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर पुणे, मुंबई, नेपाळ आणि थायलंड येथे नेत लैंगिक अत्याचार करून तिच्याकडून तब्बल २५ लाख रुपये उकळणाऱ्या एकावर गुन्हा दाखल केला आहे. कबीर अहमद खान ऊर्फ कबीर अरोरा (वय ३०) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. यासंदर्भात २५ वर्षीय तरुणीने मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडित तरुणी पुण्यात ट्रेनिंगसाठी आली होती. त्या वेळी आरोपी कबीर खान याने तिच्याशी ओळख वाढवून तिला लग्नाचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. अत्याचाराचा प्रकार पुण्यात घडल्याने हा गुन्हा आता विश्रांतवाडी पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केला आहे.



