Home » राष्ट्रीय » महायुती सरकारला शरद पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना !

महायुती सरकारला शरद पवारांनी दिल्या महत्वाच्या सूचना !

पुणे : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्यातील मराठवाड्यासह अनेक भागांत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत. उभ्या पिकांसह शेतातील सुपीक मातीही वाहून गेली आहे, तर अनेक ठिकाणी जनावरे दगावली आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी राज्य सरकारला राज्यातील पूरग्रस्तांना कशाप्रकारे मदत करावी, याबाबत आवाहन करत काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे, विशेषतः मराठवाड्यात सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील रविवारी मराठवाड्यातील सात जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील पावसाच्या आणि मदतीच्या स्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. तसेच अधिकारी वर्गाला महत्त्वाच्या सूचना केल्या. आता शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला पाच प्रमुख सूचना केल्या आहेत.

शरद पवार यांची सोशल मीडिया पोस्ट काय?

राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपुर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, असे मी सुचवू इच्छितो.

1. पंचनामा प्रक्रियेसाठी ठरावीक मुदतीचे बंधन नसावे.

अभुतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानीची दखल घेतली जात नाही. उदा. अतिवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशुधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.

2. नुकसान भरपाई सोबत पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करणे.

– वस्तुत: आपदग्रस्तांना दिली जाणारी मदत ही नुकसान भरपाई नसून अंशत: दिलासा असतो. शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असावा.

– वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा व इतर सिंचन साधनांची दुरुस्ती व गाळ काढण्याची तसेच शेतकऱ्यांच्या बांध-बंदिस्तीची कामे हाती घ्यावीत. पुनर्बांधणी व पुनरूज्जीवनाची कामे मनरेगा कामांतून कशी होतील, आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल याचे देखील नियोजन करावे.

– शाळा, आरोग्य, वीज, रस्ते व इतर पायाभूत सुविधांच्या पुनरूज्जीवनाचा आराखडा तयार करावा. पाऊस कमी झाल्यावर व पूर ओसरल्यानंतर ह्या आराखडयाची अंमलबजावणी तातडीने कशी होईल याकडे लक्ष द्यावे.

3. साहित्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यावा.

अतीवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झाले आहे. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात.

4. शेतकरी हिताचे निर्णय.

– पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे.

– वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ तहकूब करावी आणि शेतकरी व व्यवसायिक यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी.

5. मानसिक व सामाजिक आधार.

– आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधीत व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे.

ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, याचा मला विश्वास आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *