मुंबई : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आज बैठक पार पडली. या बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा करण्यात आली आहे. सध्या या पदावर जयंत पाटील होते. पाटील यांनी राजीनामा दिला असून आता या पदावर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे यांची निवड ही एकमताने करण्यात आली. शिंदे हे शरद पवारांचे विश्वासू नेते मानले जातात. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाल्याची चर्चा आहे. मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीच त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर शशिकांत शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलाची चर्चा सुरू होती. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गेल्या सात वर्षांपासून पक्षाची धुरा सांभाळत आहेत. या आधीच्या एका कार्यक्रमात त्यांनी आपल्याला या पदावरून मुक्त करावे आणि नव्या लोकांना संधी द्यावी अशी जाहीर मागणी केली होती. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चाही सुरू झाली. त्यानंतर आज अखेर पक्षाला नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे.



