जळगाव : प्रतिनिधी
एमआयडीसी परिसरातील जगवाणी नगर येथे दि. १६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास गेटसमोरील दुकान क्रमांक ०४ चे शटर वाकवून त्यातून तब्बल १.८५ लाख रुपयांच्या जुना व नव्या तांब्याच्या तारा चोरण्यात आल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३०२/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०५ (अ), ३३१(३), ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा घडल्यानंतर तपासासाठी पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गुन्हे शोध पथक स्थापन करण्यात आले. या पथकात पो.उ.नि. राहुल तायडे, सफौ. विजयसिंग पाटील, पो.हे. गणेश शिरसाळे, पो.ना. प्रदीप चौधरी व पोकों. निलेश पाटील यांचा समावेश होता.
या तपासादरम्यान दोन आरोपींना २ मे २०२५ रोजी अटक करण्यात आली होती. मात्र आरोपी शिकवणसिंग बरियामसिंग उर्फ पटमलसिंग टाक हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. अखेर ४ ऑगस्ट २०२५ रोजी वाघनगर परिसरात फिरताना तो गुप्त माहितीच्या आधारे सफौ. पाटील व पो.ना. चौधरी यांनी ताब्यात घेतला. पोलिस कोठडीत चौकशीदरम्यान आरोपीने ५० किलो वजनाचे, अंदाजे २७ हजार रुपये किमतीचे जुने व नवे तांब्याचे तार काढून दिले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास पो.उ.नि. राहुल तायडे व पोकों. निलेश पाटील हे करत आहेत.
संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, पोलीस उप अधीक्षक श्री. संदीप गावीत व पो.नि. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



