Home » महाराष्ट्र » “भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटाला फटका? ३५ आमदार जाणार भाजपात : ठाकरे गटाचा धडाकेबाज दावा!”

“भाजपच्या ‘ऑपरेशन लोटस’मध्ये शिंदे गटाला फटका? ३५ आमदार जाणार भाजपात : ठाकरे गटाचा धडाकेबाज दावा!”

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील महायुती सरकारमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटातील तब्बल 35 आमदार भाजपत जाणार असल्याचा गंभीर दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केला आहे. भाजपनेच तयार केलेला पक्ष आता भाजपच संपवणार असल्याचा आरोप करून ठाकरे गटाने शिंदेंवर थेट निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून म्हटले आहे की, सध्या राज्यात निर्माण झालेल्या ‘नाराजी’च्या वातावरणाचा वाढवून अर्थ लावण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीतील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तक्रार केल्याचे समोर आले. “भाजप आमचा पक्ष फोडत आहे, पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत,” अशी तक्रार शिंदेंनी केली असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

मुखपत्रातील दाव्यानुसार, शिंदे यांच्या तक्रारीवर अमित शहा यांनी हसत प्रतिक्रिया देत त्यांना “क्रोनॉलॉजी समजावून” सांगितली. शहा यांनी शिंदेंना उत्तर देताना, भाजपनेच फोडाफोड करून त्यांचा पक्ष उभा केला असून तो ‘पक्ष’ म्हणून टिकून आहे ते भाजपच्या मान्यतेमुळेच, असे म्हटल्याची उल्लेखित माहिती ठाकरे गटाने प्रसिद्ध केली आहे.

याच माध्यमातून ठाकरे गटाने दावा केला आहे की आगामी काळात शिंदे गटातील किमान 35 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने एकदा बाळासाहेब ठाकरे यांची मूळ शिवसेना फोडली, आणि आता दुसऱ्या ‘ऑपरेशन लोटस’मधून शिंदे गटावरच घाव घातला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शिंदे यांनी दिल्ली दौरा ‘यशस्वी’ झाल्याचा दावा केला असला, तरी ठाकरे गटाने त्याला फोल ठरवत, “शिवसेना फोडताना ज्या तलवारीचा वापर शिंदेंनी केला, त्याच तलवारीने आता त्यांच्यावरच वार होत आहेत,” असा घणाघात केला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *