पुणे : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील पुणे येथील ऐतिहासिक जैन बोर्डिंगच्या जागेवरील वादग्रस्त व्यवहार अखेर रद्द झाल्यानंतर या प्रकरणात शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जैन मुनींची भेट घेऊन समाजाला दिलेला शब्द पाळल्याचा आनंद व्यक्त केला. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मी आजही विकृतीविरोधात बोलतो, भाजपविरोधात नाही. माझा लढा हा समाजहितासाठी आहे. नीलेश घायवळ कसा पळाला, हा विषय अजून संपलेला नाही, असे वक्तव्य करत भविष्यातील राजकीय संघर्षाचे संकेत दिले. या संपूर्ण प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेला शब्द पाळला असून, त्यांनी कुठेही अडथळा आणला नाही, असे सांगत धंगेकरांनी शिंदेंचे आभार मानले.

धंगेकर म्हणाले की, जैन धर्म हा शांतता, अहिंसा आणि दानशूरतेचे प्रतीक आहे. मी अनेक वर्षांपासून या समाजाबरोबर कार्य करत आहे. जैन बोर्डिंगच्या विटेलापण हात लावू देणार नाही, हे मी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले होते. भगवान महावीरांच्या आशीर्वादाने आणि संतांच्या प्रेरणेनेच मी समाजाला दिलेला शब्द पाळू शकलो. धंगेकर यांनी पुढे सांगितले की, माझी कोणाच्याही कुटुंबाशी लढाई नाही, पण कोणी विकृती आणि भ्रष्टाचाराचा खेळ केला तर मी थांबणार नाही. जर या प्रकरणाचा तिसरा अंक सुरू झाला, तर मी राजकीय आयुष्याची चिरफाड करीन, असा थेट इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, पुण्यातील शिवाजीनगर येथील जैन बोर्डिंगच्या जागेवर गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू होता. हिराचंद नेमचंद दोषी यांनी 1958 साली ही वसतिगृहं उभारली होती, जी दिगंबर आणि श्वेतांबर जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी होती. मात्र अलीकडेच ही जागा काही विश्वस्तांनी विकासाच्या नावाखाली विक्रीसाठी दिल्याचे समोर आले. समाजातील अनेक सदस्यांनी याला तीव्र विरोध केला आणि विक्रीच्या प्रक्रियेत धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नियमांची पायमल्ली केल्याचा आरोप केला. या व्यवहारामध्ये गोखले कन्स्ट्रक्शन कंपनीसह काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेल्याने प्रकरण अधिकच गाजले.



