Home » महाराष्ट्र » पर्यटन हंगामातच धक्का :संभाजीनगरची दोन्ही विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित

पर्यटन हंगामातच धक्का :संभाजीनगरची दोन्ही विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी

पर्यटन हंगामाच्या ऐन गर्दीत छत्रपती संभाजीनगर शहराची मुंबई आणि बेंगळूरू मार्गावरील महत्त्वपूर्ण विमानसेवा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय इंडिगो प्रशासनाने घेतला आहे. या अचानक झालेल्या बदलामुळे पर्यटन व्यावसायिक, उद्योगपती तसेच नियमित प्रवाशांत संतापाची लाट उसळली आहे.

इंडिगोच्या सॉफ्टवेअरमधील बिघाड तसेच क्रू मेंबरच्या कमतरतेमुळे कंपनीने लहान शहरांवरील विमानफेऱ्यांना तात्पुरते स्थगिती देण्याचा मार्ग अवलंबला आहे. याअंतर्गत यापूर्वी हैदराबादची दुपारची विमानसेवाही १५ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.

बेंगळूरू-छत्रपती संभाजीनगर ही आठवड्यातून तीन दिवस चालणारी विमानसेवा ९ ते १५ डिसेंबरदरम्यान बंद राहणार आहे. तर मुंबई-छत्रपती संभाजीनगर ही सायंकाळची सेवा देखील १५ डिसेंबरपर्यंत स्थगित केल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, रेल्वे आणि इतर विमानसेवाही हवामानामुळे विस्कळीत झाल्या आहेत. उत्तर भारतातील धुक्यामुळे सचखंड एक्सप्रेस तब्बल सहा तास उशिराने छत्रपती संभाजीनगर स्थानकात दाखल झाली. रोज सकाळी ९.४० वाजता येणारी ही रेल्वे रविवारी (७ डिसेंबर) दुपारी ३.४० वाजता पोहोचली. त्याचप्रमाणे दिल्लीहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाला अर्धा तास, तर एअर इंडियाच्या सकाळच्या दिल्ली फ्लाइटला सुमारे २० मिनिटांचा विलंब झाला. विमानसेवा बंद, रेल्वे उशिरा—यामुळे पर्यटन हंगामात प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून प्रशासनाने तातडीने पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाढत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *