Home » जळगाव » धक्कादायक : आईला धमकावत अल्पवयीन मुलीचे लग्न !

धक्कादायक : आईला धमकावत अल्पवयीन मुलीचे लग्न !

जळगाव : प्रतिनिधी

सहा वर्षीय मुलाला जिवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन लेकीचा विवाह लावल्याचा आरोप करणाऱ्या पीडितेच्या आईने अडीच महिन्यांनंतर प्रशासनाचे दरवाजे ठोठावले आहेत. या लेकीच्या विवाह सोहळ्याला खुद्द फिर्यादी आईच उपस्थित होती, ही बाब तपासात निष्पन्न होत गेल्यावर आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. मात्र, फिर्यादी महिलेने ‘चाइल्ड हेल्पलाइन’ला संपर्क केल्यानंतर लग्नाचा प्रवास मांडला. हा प्रवास ऐकून गोंधळलेल्या पोलिसांसह प्रशासनाने जामनेर पोलिसात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

पीडितेच्या फिर्यादी आईच्या म्हणण्यानुसार, बालाघाट (मध्य प्रदेश) येथील आदिवासी महिला ६ वर्षीय मुलगा आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत नागपूरहून भुसावळला आली. वीट भट्टीवर काम करणाऱ्या या मायलेकींना भुसावळच्या एकाने लग्नाचे आमिष दिले आणि त्यानंतर दोघांना शहापूर ता.जामनेर येथे नेले. जून महिन्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला.

भुसावळचे महेश जोशी व त्यांच्या पत्नी, ज्ञानेश्वर पाटील, प्रवीण पाटील (शहापूर) गजानन पाटील व त्यांची पत्नी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर पीडितेच्या आईने माझ्या मुलाला जिवे मारण्याची धमकी देऊन हा विवाह लावल्याचा आरोप करीत ‘चाइल्ड हेल्पलाइन’शी संपर्क केला. लग्नाला पीडितेची आईच उपस्थित असल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात टाळाटाळ केली. त्यानंतर हा प्रकार जिल्हाधिकाऱ्यांसमोर गेला. जिल्हाधिकारी यांनी गुन्हा दाखल करून तपासात निष्पन्न होणाऱ्या गोष्टींच्या आधारे कायदेशीर कारवाईची दिशा निश्चित करावी, असे निर्देश दिले. त्यानुसार सहा जणांविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकतर पैसे घेऊन विवाह लावतात आणि काही दिवसांनी नववधूसह नातलग पसार होतात, अशा घटनांचे प्रमाण वाढले आहे. तसेच, फिर्यादी महिला लेकीच्या लग्नाला उपस्थित होती आणि जूनमधील लग्नानंतर अडीच महिन्यांनी यंत्रणांशी संपर्क साधला आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहारातून ही तक्रार केली असावी, या दृष्टिकोनातूनही प्रशासन या घटनेच्या तपासावर लक्ष केंद्रीत करीत आहे. दरम्यान, पीडितेची बालगृहात, तर तिच्या आईची शासकीय आशादीप महिला वसतिगृहात रवानगी करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *