मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता यावर अजित पवार गटाचे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक वादग्रस्त विधान केल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादंग सुरु होण्याचे चिन्ह आहे. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. आम्हाला निवडून यायचं असतं, त्यामुळे आम्ही निवडणुकीत काहीतरी अश्वासन देत असतो. पण लोकांनी ठरवायला पाहिजे की नेमकं काय मागायचं, असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर शेतकरी नेते, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी देखील टीका केल्यानंतर त्यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली.
कर्जमाफीवरून बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विधानानंतर त्यांच्याच पक्षाचे मंत्री छगन भूजबळ यांनी घरचा आहेर दिला. भूजबळ म्हणाले की, “नाद लागणं असं बोलण हे आमच्या नेत्याचे चुकीचं विधान आहे. अजितदादा याकडे लक्ष घालतील. कोण काय बोलत, या सगळ्याकडे त्यांच लक्ष असतं,” असं ते म्हणाले.
बाबासाहेब पाटील यांच वक्तव्य दुर्दैवी असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. “लातूर हा निसर्गावर अवलंबून शेती करणारा जिल्हा आहे. येथे मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. अशा भागातून येणाऱ्या बाबासाहेब पाटलांसारख्या तळागाळातल्या माणसाचं वक्तव्य म्हणजे सत्तेची झूल चढल्यानंतर डोळ्यावर आलेल्या धूंदीचा प्रकार आहे. सोयाबीनचा भाव खाली गेला असताना उत्पादन खर्च वाढत आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला झाल्याने आत्महत्या करत आहेत. याला नाद लागलाय म्हणायच का? निवडणुकीत मतं घेण्यासाठी अश्वासन द्यावी लागतात, अस वक्तव्य संतापजनक आहे. महायुतीच्या सर्वच नेत्यांनी ताळतंत्र सोडला आहे. जनता त्यांना त्यांची जागा दाखवेल,” असे शेट्टी यांनी म्हटले आहे.
