जळगाव : प्रतिनिधी
शाळेत मित्रासोबत झालेल्या भांडणात वर्गमित्राने मारहाण केल्यामुळे आर. आर. विद्यालयातील कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५, रा. रचना कॉलनी) या नववीत शिकरणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. कल्पेशच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचे कारण मेंदूला अंतर्गत मार लागल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी दिशाभूल केली असून त्यांच्याविरुद्धही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आर. आर. विद्यालयात कल्पेश इंगळे हा इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत होता. त्याच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटल्या प्रमाणे, शाळेत मधल्या सुटीमध्ये कल्पेश व त्याच्या वर्गमित्रामध्ये वाद झाला होता. यावेळी त्याच्या वर्गमित्राने कल्पेश यास पाठीत व तोंडावर बुक्यांनी मारहाण केल्यामुळे तो खाली फरशीवर डोक्यावर पडून मयत झाला. त्याच्या मृत्यूस वर्गमित्र कारणीभूत झाला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यावरून वर्गमित्राविरुद्ध मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वर्गमित्रास पोलिसांनी ताब्यात घेत बाल न्याय मंडळासमोर हजर केले. त्यानंतर त्याची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली.
कल्पेश शिकत असलेल्या शाळेने सुरुवातीपासूनच आम्हाला खोटी माहिती दिली. मात्र अद्याप त्यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. जो पर्यंत त्यांच्यावर कारवाई होणार नाही, तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. तसेच नातेवाईकांनी कल्पेशला चार जणांनी मारहाण केली असून त्याचे हात हिरवे व पाय पांढरे पडले होते, तसेच डोक्याला जखम झाली व त्याचा गळा दाबला असा आरोप त्यांनी केला.



