नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तराखंडमधील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या हरिद्वार येथील मनसा देवी मंदिरात आज (२७ जुलै) सकाळी दर्शनासाठी जमलेल्या मोठ्या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याची भीषण घटना घडली. या दुर्घटनेत किमान सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच गोंधळ आणि खळबळ उडाली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. “मनसा देवी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मी स्वतः घटनास्थळाकडे रवाना होत आहे. संपूर्ण घटनेचा सविस्तर अहवाल येणे बाकी आहे.”
मनसा देवी मंदिर हे श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर भाविकांना आकर्षित करते. मात्र गर्दी नियंत्रणाच्या उपाययोजना अपुऱ्या ठरल्याने ही दुर्घटना घडल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. स्थानिक प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी अधिक सुरक्षा रक्षक आणि पोलिसांची तातडीने नियुक्ती केली आहे. या दुर्घटनेमुळे मंदिर प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



