जळगाव : प्रतिनिधी
जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी गहाळ झालेल्या ६३ मोबाइलचा सायबर पोलिसांनी शोध लावून ते हस्तगत केले. हे मोबाईल शनिवारी (१८ ऑक्टोबर) जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याहस्ते मूळ मालकांना परत देण्यात आले. दिवाळी सणात मोबाइल परत मिळाल्याने सर्वाच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणाहून व बाजारातून महागडे मोबाइल गहाळ झाले होते.
या संदर्भात त्या-त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत नोंद होती. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक गणेश यांच्या अहिरे मार्गदर्शनाखाली पोहेकों किरण वानखेडे, हेमंत महाडिक, पोलिस नाईक सचिन सोनवणे, पोकों पंकज वराडे, गौरव पाटील, मिलिंद जाधव, दीपक पाटील यांनी शोधमोहीम राबविली. महागडे मोबाईल हरविल्यानंतर ते सापडणार नाही, असे मोबाइल मालकांना वाटत होते. मात्र सायबर पोलिसांनी सीईआयआर पोर्टलवर नोंद असलेल्या गहाळ मोबाइलच्या आयएमईआय क्रमांकावरून तांत्रिक विश्लेषणातून शोध घेत मोबाइल हस्तगत केले. ऐन दिवाळीत मोबाईल परत मिळाल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
गहाळ झालेले मोबाइल ज्याला सापडले त्याने ते दुसऱ्याला विक्री केले. मोबाईलचा शोध घेत असताना ते विकत घेणारा ट्रेस झाला. पोलिसांनी त्याच्याकडून मोबाइल हस्तगत केले. यामध्ये मोबाइल विकत घेणाऱ्याच्या हातून मोबाइल तर गेलाच शिवाय त्याचे पैसेही वाया गेले. त्यामुळे कोणतीही सेकंडहँड वस्तू घेताना काळजी घेणे आवश्यक आहे, असे पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांनी यावेळी सांगितले.
