हिंगोली : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून सरकार यावर मदतीचे आश्वासन दिले असताना आता राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा तसेच कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करण्याच्या मागणीसाठी डॉ. रमेश शिंदे यांनी बुधवारपासून ता. १५ केसापूर (ता.हिंगोली) येथील स्मशानभूमीत चितेवर बसून उपोषण सुरु केले आहे. दिवसभरात प्रशासनाचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नसल्याने शेतकऱ्यांतून तिव्र संताप व्यक्त होत आहे. या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देण्याची तयारी सुरु केली आहे.
राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहिर केला जात नाही. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या तर हाती आलेली पिके वाहून गेली आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांना जिवन जगणे कठीण झाले आहे. बँकेचे कर्ज कसे फेडावे तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांना भरीव मदत देण्या ऐवजी ८५०० रुपयांची तुटपुंजी मदत देत आहे.
या शिवाय हिंगोली शहराजवळ कयाधू नदीवर खरबी येथे बंधारा बांधून कयाधू नदीचे पाणी इसापूर धरणात वळवले जाणार आहे. त्यामुळे हिंगोली जिल्हयातील शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होणार असून जिल्हयातील शेतीचे वाळवंट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सदर बंधारा तातडीने रद्द करावा अशी मागणी डॉ. रमेश शिंदे यांनी केली आहे.
शासनाने राज्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली तालुक्यात तीन ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र त्यानंतरही शासनाकडून ओला दुष्काळ जाहिर झाला नाही. त्यामुळे डॉ. शिंदे यांनी बुधवारी ता. १५ सकाळ पासून केसापूर (ता.हिंगोली) येथील स्मशानभूमीत चितेवर बसून आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास परिसरातील शेतकऱ्यांनी पाठिंबा देऊन सहभाग नोंदवण्याची तयारी सुरु केली आहे.
