मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसह मनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले होते. यादरम्यान सरकारकारकडून त्यांच्या आठपैकी 6 मागण्या मान्य करण्यात आल्या. तसेच हैद्राबाद गॅझेटीयरनुसार अध्यादेश काढण्यात आला. परंतु त्यानंतरही मराठा आरक्षणासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम आहे. यातच आता मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे. ‘जर आम्हाला आरक्षण दिले नाही तर आम्ही मुंबईकरांचा भाजीपाला, दूध बंद करू अशी धमकी दिली आहे. तसेच हे बंद झाले की मुंबईकर काय वाळू खाणार का?’ असाही सवाल त्यांनी केला.
मुंबईतील आंदोलन संपल्यानंतर जरांगे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातून डिचार्ज झाल्यानंतर ते काल बीडच्या नारायण गडावर आले होते. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारला इशारा दिला. सरकारने तसेच मराठा समाजाला १७ सप्टेंबरपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु त्या सर्व प्रक्रियेला वेळ लागेल असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. यावेळी त्यांनी दसरा मेळावा घेणार असल्याचे जाहीर केलं.
“आरक्षण मिळाल्यानंतर आता उपोषण करणार नाही, रस्त्यावर उतरणार. मुंबईत जाणारा भाजीपाला आणि दूध बंद करू. जर भाजीपाला आणि दूध बंद केलं तर मुंबईकर काय वाळू खाणार का, सरकारने निर्णयाची अंमलबजावणी न केल्यास दसरा मेळाव्यातून पुन्हा इशारा देऊ,” असे मनोज जरांगे यांनी सांगितले आहे. “जीआरचा फायदा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला होणार आहे. जर काही चुकले तर सुधारित जीआर काढावा लागेल, हे आम्ही स्पष्ट करून घेतले आहे. नारायण गडावर आपल्या दसरा मेळाव्याच्या तयारीला लागा,” असे आवाहन देखील यावेळी जरांगे यांनी केले.
